सामाजिक

वारकरी सेवेसाठी हॉटेल मधुबनचा पुढाकार; बारामती नगरपरिषदेला २०० कोरोगेटेड बॉक्सचे योगदान


बारामती/संपादक-(विकी आगम)
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि शहरातील स्वच्छता व्यवस्थेला बळकटी देण्याच्या उद्देशाने बारामतीतील हॉटेल मधुबनचे संचालक सचिन झगडे यांनी यंदाही सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मातोश्री सौ. सुमन उद्धवराव झगडे यांच्या हस्ते बारामती नगरपरिषदेला स्वच्छता व्यवस्थेसाठी २०० कोरोगेटेड बॉक्स प्रदान करण्यात आले.

याशिवाय पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांच्या सोयीसाठी मोबाईल चार्जिंग पॉइंट तसेच पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. वारकरी सेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, मुख्याधिकारी पंकज भुसे, बांधकाम समिती सभापती अमर धुमाळ, पाणीपुरवठा समिती सभापती मनीषा समीर चव्हाण, मनीषा बनकर, गोरख पारसे, पक्षप्रतोद श्री विशाल हिंगणे, अमोल कावळे, वैभव जगताप, आरोग्य विभाग प्रमुख स्वरूप अहिवाळे, अजय लालबिगे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दरवर्षी लाखो वारकरी बारामतीत दाखल होत असल्याने पालखी सोहळ्याच्या काळात स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य आणि मूलभूत सुविधांचे प्रभावी नियोजन करण्यासाठी बारामती नगरपरिषद प्रशासन व्यापक तयारी करत आहे. अशा वेळी सामाजिक संस्था, उद्योजक आणि नागरिकांकडून मिळणारे सहकार्य प्रशासनासाठी मोलाचे ठरत आहे.

नगराध्यक्ष सचिन सातव म्हणाले, “बारामतीतील पालखी सोहळा अधिक भव्य, दिव्य आणि दिमाखदार व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा पवार याही तयारीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अशा वेळी सेवाभावी संस्था, उद्योजक आणि नागरिक नगरपरिषदेच्या कार्यात सहभागी होत असल्याचे पाहणे आनंददायी आहे.” मुख्याधिकारी पंकज भुसे म्हणाले, “पालखी सोहळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. सामाजिक संस्था आणि नागरिकांचे सहकार्य मिळाल्याने कर्मचारी वर्गाचा उत्साह वाढतो. पालखी सोहळ्यासाठी कोणत्याही स्वरूपात मदत करू इच्छिणाऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन आम्ही करीत आहोत.” वारकरी सेवा हीच ईश्वर सेवा मानणाऱ्या बारामतीच्या परंपरेला साजेसा हा उपक्रम असून, हॉटेल मधुबन आणि सचिन झगडे परिवाराचे योगदान इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने प्रशासन आणि समाज यांच्यातील समन्वयाचे हे एक सकारात्मक उदाहरण मानले जात आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *