दौंड येथील पिरॅमिड हॉस्पिटल प्रकरणाची स्वतंत्र SIT चौकशीची मागणी; २१ सप्टेंबरपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा..

प्रतिनिधी : विवेक साळुंके
दौंड : दौंड येथील पिरॅमिड हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व इतर शासकीय आरोग्य योजनांतील कथित गैरव्यवहार, रुग्णांवरील चुकीचे उपचार आणि आर्थिक अनियमिततांच्या आरोपांची स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे पुणे जिल्हा महामंत्री कुणाल (ओंकार) कड्डे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी राज्य शासन, आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात पिरॅमिड हॉस्पिटलमध्ये शासकीय योजनांअंतर्गत उपचार घेतलेल्या रुग्णांच्या नोंदी, उपचार प्रक्रिया, मंजूर प्रकरणे, शासकीय निधीचा वापर आणि संबंधित आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच रुग्णांच्या वैद्यकीय नोंदी, शस्त्रक्रिया अहवाल, डिस्चार्ज समरी आणि उपचाराशी संबंधित कागदपत्रांची तज्ज्ञ समितीमार्फत तपासणी करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. चौकशीत दोष आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून पीडित रुग्णांना न्याय व नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणी वारंवार तक्रारी व निवेदने देऊनही अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप करत, २१ सप्टेंबर २०२६ पासून दौंड तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत असून संबंधित प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )

