क्राईमताज्या घडामोडीमहत्त्वाचेमहाराष्ट्रशहरसामाजिक

सुपा पोलीस ठाणे पुन्हा चर्चेत! दोन लाखांच्या कथित मागणीचा आरोप? ५० हजारांच्या व्यवहाराची ऑडिओ क्लिप व्हायरल


बारामती संपादक – (विकी आगम)

बारामती तालुक्यातील सुपा पोलीस ठाणे पुन्हा एकदा कथित आर्थिक व्यवहाराच्या आरोपांमुळे चर्चेत आले आहे. वढाणे येथील एका गुन्ह्याच्या अनुषंगाने संशयित आरोपींच्या नातेवाईकांकडून मदत करण्याच्या नावाखाली दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. यातील ५० हजार रुपयांच्या व्यवहाराचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात येत असलेली कथित मोबाईल ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या प्रकारामुळे पोलीस वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर झाल्याचा संशय?

मिळालेल्या माहितीनुसार, वढाणे येथील एका गुन्ह्याच्या संदर्भात संशयित आरोपींच्या कुटुंबीयांना मदत करण्याच्या कारणावरून पैशांची मागणी झाल्याचा आरोप आहे. या कथित संभाषणात एका पोलीस हवालदाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांचा उल्लेख करत, कमी रक्कम दिल्यास काम होणार नसल्याच्या आशयाचे वक्तव्य केल्याचा दावा केला जात आहे.

या संभाषणाचे मोबाईलवर ध्वनिमुद्रण करण्यात आल्याचे सांगितले जात असून, संबंधित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.

हवालदाराची मागणी की वरिष्ठांच्या नावाचा गैरवापर?

या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, संबंधित हवालदाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून स्वतःहून पैशांची मागणी केली का, की या कथित व्यवहारामागे अन्य कोणाची भूमिका आहे? वरिष्ठ अधिकाऱ्यांना या कथित मागणीची माहिती होती का, त्यांची संमती होती का किंवा त्यांच्या नावाचा गैरवापर झाला का, याची चौकशी होणे आवश्यक आहे.

कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने आरोप सिद्ध होत नाहीत. त्यामुळे या ध्वनिमुद्रणाची सत्यता, संभाषणातील व्यक्तींची ओळख आणि कथित आर्थिक मागणीचा संपूर्ण घटनाक्रम तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.

निष्पक्ष चौकशी करून कारवाईची मागणी

या कथित प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी आणि आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक स्तरातून होत आहे.

आता या तक्रारीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस प्रशासन काय भूमिका घेते आणि चौकशीतून नेमके काय समोर येते, याकडे बारामती तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *