बारामतीत DJच्या कर्णकर्कश आवाजावर पोलिसांचा कडक इशारा; पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यावर पोलिसांचा जोर
बारामती/संपादक-(विकी आगम)
सार्वजनिक मिरवणुका, धार्मिक व सामाजिक उत्सव उत्साहात साजरे करताना नागरिकांची शांतता, आरोग्य आणि सामाजिक सलोखा अबाधित राहावा, यासाठी बारामती शहर पोलिसांनी नियमबाह्य आणि कर्णकर्कश DJच्या वापराविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. “कायद्यापेक्षा DJ मोठा नाही!” असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला आहे. एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत DJ Sound Systemच्या नियमबाह्य वापराबाबत तीन स्वतंत्र प्रकरणांत कारवाई करण्यात आली. एका मिरवणुकीतील DJ नियमभंगाप्रकरणी २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या प्रकरणात वाहनासह संपूर्ण DJ Sound System जप्त करण्यात आले. तर आणखी एका मिरवणुकीदरम्यान पूर्वप्रतिबंधात्मक नोटीस आणि प्रत्यक्ष पोलीस सूचना देऊनही DJ बंद न केल्याप्रकरणी १७ DJ मालक/चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
DJची स्पर्धा नको; संस्कृतीची आणि समाजकार्याची स्पर्धा व्हावी!
बारामती शहराचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी उत्सव साजरे करणाऱ्या मंडळांच्या भूमिकेबाबत महत्त्वाची भूमिका मांडली आहे.
कोणाचा DJ मोठा, कोणाचा Bass जास्त यापेक्षा कोणते मंडळ समाजासाठी मोठे काम करते, याची स्पर्धा व्हावी, अशी भूमिका चिवडशेट्टी यांनी मांडली.
उत्सवांच्या माध्यमातून युवकांनी केवळ मिरवणुकीपुरते मर्यादित न राहता रक्तदान, व्यसनमुक्ती जनजागृती, स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन, वाहतूक सुरक्षा, गरजू विद्यार्थ्यांना मदत आणि सामाजिक ऐक्याचे संदेश देणारे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
DJपेक्षा पारंपरिक संस्कृतीला प्राधान्य
DJचा आवाज आणि Bass वाढविण्याच्या स्पर्धेपेक्षा ढोल-ताशा, लेझीम, झांज, हलगी आणि इतर पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याची भूमिका पोलिसांनी मांडली आहे.
पारंपरिक वाद्यांमधून महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जपण्याबरोबरच युवकांमध्ये शिस्त, संघभावना, समन्वय आणि सामाजिक सहभाग वाढण्यास मदत होते. मात्र पारंपरिक वाद्ये वापरत असतानाही आवाजाची आणि वेळेची कायदेशीर मर्यादा पाळणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
कारवाई कोणत्याही धर्म किंवा समाजाविरोधात नाही
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, ही कारवाई कोणत्याही धर्म, समाज किंवा उत्सवाविरोधात नसून कर्णकर्कश आवाज, नियमभंग आणि कायदेशीर आदेशाची अवज्ञा करणाऱ्यांविरोधात आहे.
उत्सव साजरा करण्याचा अधिकार सर्वांना आहे; त्याचप्रमाणे वृद्ध, रुग्ण, विद्यार्थी, लहान मुले आणि सामान्य नागरिकांच्या शांततेचा व आरोग्याचा अधिकारही महत्त्वाचा आहे.
DJ मालक आणि आयोजकांना स्पष्ट संदेश
DJ मालक, चालक, ऑपरेटर आणि आयोजकांनी कायदेशीर नियमांचे पालन करावे. पोलीस आदेशाचे पालन न केल्यास संबंधितांच्या प्रत्यक्ष भूमिकेनुसार गुन्हा दाखल होऊ शकतो.
गुन्ह्यात प्रत्यक्ष वापरलेले DJ Sound System, Speakers, Bass Units, Amplifiers, Mixers तसेच वाहन कायदेशीर प्रक्रियेनुसार जप्त केले जाऊ शकते. CCTV, फोटो, व्हिडिओ आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील तपास करण्यात येत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत इंगवले, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, अजित पाटील, टळकीकर, अशोक राऊत आणि रत्नदीप भंडारे यांचा सहभाग राहिला.
बारामती शहर पोलिसांचा स्पष्ट संदेश कायद्याचा सन्मान करा संस्कृती जपा आणि उत्सवातून समाजहित साधा

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )
