क्राईममहत्त्वाचेशहर

दादा पाटील नगर तांदुळवाडी येथे आईची आणि मुलाची गळफास घेऊन आत्महत्या


बारामती संपादक-(विकी आगम)
बारामती तालुक्यातील तांदुळवाडी येथील दादा पाटीलनगर परिसरात ४१ वर्षीय महिला आणि तिच्या १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २१ ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली. मुलगा घरातील पत्र्याच्या अँगलला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, तर त्याची आई घरातील खोलीत मृतावस्थेत आढळून आली. महिलेच्या गळ्यावर काळसर व्रण असल्याचे प्राथमिक माहितीत नमूद करण्यात आले आहे. मयत महिलेचे नाव रमा विजय गावडे (वय ४१) असून मुलाचे नाव विवेक विजय गावडे (वय १७) आहे. हे कुटुंब दादा पाटीलनगर, तांदुळवाडी येथे राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, मयतांचा पती विजय गावडे हे २० ऑगस्ट रोजी रात्री कंपनीत नोकरीसाठी गेले होते. शुक्रवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास ते घरी परतले असता घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पत्नी व मुलाला आवाज दिला; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर शेजाऱ्याच्या मदतीने घराच्या खिडकीतून पाहणी केली असता मुलगा विवेक हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर दरवाजा उघडून घरात प्रवेश केल्यावर रमा गावडे या देखील मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या गळ्यावर काळसर व्रण असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून दोघांनाही उपचारापूर्वीच मृत घोषित केले. प्राथमिक पाहणीत दोघांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र आईचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि दोघांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम तसेच पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुधीर काळे हे या प्रकरणाचा प्राथमिक तपास करीत आहेत. दरम्यान, आई आणि मुलाच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याचा पोलीस तपास सुरू असून पुढील तपासानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *