क्राईममहत्त्वाचेमहाराष्ट्रशहरसामाजिक

नायलॉन मांजा विकाल तर थेट पोलीस कारवाई\! बारामती पोलिसांचा इशारा


घरात लपवून ठेवला तरी सुटका नाही; विक्री, साठवणूक आणि वापर करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

बारामती/ संपादक-(विकी आगम)
बारामती शहर व परिसरात प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक आणि वापर करणाऱ्यांविरोधात बारामती शहर पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. नायलॉन मांजा दुकानात उघडपणे विकण्याऐवजी घरात, गोदामात किंवा इतर ठिकाणी लपवून ठेवला तरी पोलिसांच्या कारवाईपासून सुटका होणार नाही, असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर गुणवडी येथील वायसेवस्ती परिसरात पोलिसांनी कारवाई करत १६ नग प्रतिबंधित नायलॉन मांजाचे रिल जप्त केले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त मांजाची अंदाजे किंमत ६ हजार ४०० रुपये आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रतिबंधित नायलॉन मांजाची साठवणूक व विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. यापुढेही बारामती शहर व परिसरात अशा प्रकारची विक्री किंवा साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

घरात साठा केला तरी कारवाई होणार!

नायलॉन मांजा दुकानात ठेवला नाही, तर घरात किंवा इतर ठिकाणी लपवून ठेवला तरी कारवाई होऊ शकते. तसेच नायलॉन मांजाचा पुरवठा करणारे, विक्री करणारे आणि मागणीनुसार गुप्तपणे उपलब्ध करून देणाऱ्यांवरही पोलिसांची नजर राहणार आहे.

ऑनलाइन विक्रीवरही पोलिसांचे लक्ष

प्रतिबंधित नायलॉन मांजाची ऑनलाइन माध्यमातून विक्री किंवा पुरवठा होत असल्यास त्याचीही माहिती घेतली जाणार असून, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार, पादचारी, लहान मुले तसेच पक्षी आणि प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी प्रतिबंधित मांजाचा वापर करू नये, तसेच पालकांनी मुलांकडून अशा मांजाचा वापर होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

“नायलॉन मांजा विकाल, साठवून ठेवाल किंवा वापराल तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. प्रतिबंधित मांजाविरोधातील मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे,” असा स्पष्ट इशारा बारामती शहर पोलिसांनी दिला आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *