क्राईममहत्त्वाचेमहाराष्ट्रशहरसामाजिक

एकाच आरोपीकडून दुसऱ्यांदा पिस्तूल जप्त; बारामती पोलिसांच्या सापळ्यात सराईत आरोपी जेरबंद


दोन जिवंत काडतुसे जप्त; तीन साथीदार फरार — शस्त्र कुठून आले, पोलिसांकडून सखोल तपास


बारामती/संपादक-(विकी आगम)

बारामती शहरात बेकायदेशीर अग्निशस्त्रांविरोधात पोलिसांनी कारवाई करत एका सराईत संशयिताला गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 25 हजार 400 रुपये आहे.

9 ऑगस्ट रोजी पोलिसांना संबंधित व्यक्ती कमरेला पिस्तूल घेऊन काही साथीदारांसह फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी माहितीची खातरजमा करून सापळा रचला. अंगझडतीमध्ये 25 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच संबंधितासोबत असलेले तीन साथीदार घटनास्थळावरून पसार झाले. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके सक्रिय करण्यात आली असून, त्यांची भूमिका आणि त्यांच्याकडे असलेल्या संभाव्य हत्यारांबाबत तपास सुरू आहे.

एकाच आरोपीकडून दुसऱ्यांदा पिस्तूल

विशेष म्हणजे, नोव्हेंबर 2025 मध्येही याच व्यक्तीकडून गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. पुन्हा त्याच्याकडून अग्निशस्त्र आढळून आल्याने पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे.

हे पिस्तूल कोणाकडून व कुठून मिळाले, शस्त्रपुरवठ्यामागे कोणाची साखळी आहे का आणि या शस्त्राचा कोणत्याही गंभीर गुन्ह्यासाठी वापर करण्याचे नियोजन होते का, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.

तीन वर्षांत सहा अग्निशस्त्रे जप्त

पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांच्या गोपनीय माहितीच्या आधारे सन 2024 ते 2026 या तीन वर्षांत बारामती शहर पोलिसांनी एकूण सहा अग्निशस्त्रे हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्थानिक पातळीवरील गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक कारवाईचे हे महत्त्वाचे उदाहरण मानले जात आहे.

या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 322/2026, शस्त्र अधिनियम कलम 3 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर करीत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम व प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत इंगवले व पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई अक्षय सिताफ, पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर, यशवंत पवार तसेच गिरीश नेवसे, सागर जामदार, विशाल शिंदे, कवितके, विजय ओंबासे व विशाल चौधरी यांनी कारवाईत सहभाग घेतला.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *