शहरसामाजिक

शिरसाई तलावात पाणी सोडण्याच्या मागणीला यश!; बारामती-पुरंदरच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा


बारामती/संपादक-(विकी आगम)

बारामती व पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शिरसाई तलावात पाणी सोडावे, यासाठी श्री. युगेंद्र श्रीनिवास पवार यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे केलेल्या मागणीला अखेर यश आले असून शिरसाई तलावात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.

भाटघर, वीर व खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे उपलब्ध अतिरिक्त पाण्याचे वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने सिंचनासाठी नियोजन करणे आवश्यक असल्याचे पवार यांनी आपल्या पत्रातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.

बारामती व पुरंदर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्याप अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नसून अनेक तलाव, बंधारे व नाले पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. विशेषतः जिरायत पट्ट्यातील गावांना दरवर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त पाण्याचे योग्य नियोजन करून ते संबंधित भागातील तलाव, ओढे व नाले भरण्यासाठी सोडण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली होती.

याच पार्श्वभूमीवर भाटघर, वीर व खडकवासला धरणांमधील उपलब्ध अतिरिक्त पाणी जनाई-शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजनेंतर्गत बारामती व पुरंदर तालुक्यातील विविध गावांमधील तलाव, ओढे व नाले भरण्यासाठी सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती.

या पाण्यामुळे केवळ शेतीला फायदा होणार नसून शेतकरी, ग्रामस्थ तसेच पशुधनासाठीही मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच आगामी काळात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होणार आहे.

या मागणीची दखल घेत शिरसाई तलावात पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने परिसरातील शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

शेतकऱ्यांच्या हिताची ही मागणी मान्य करून तातडीने कार्यवाही केल्याबद्दल महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. श्री. हनुमंत धुमाळ यांचे श्री. युगेंद्र श्रीनिवास पवार यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

धरणात अतिरिक्त पाणी, जिरायत भागात टंचाई; नियोजनबद्ध पाणीवाटपाची मागणी ठरली निर्णायक

बारामती-पुरंदरच्या जिरायत भागातील शेतकऱ्यांसाठी शिरसाई तलावात आलेले हे पाणी आगामी हंगामासाठी महत्त्वाचे ठरणार असून, पाणी उपलब्धतेचे योग्य नियोजन झाल्यास शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *