बारामतीच्या सत्तेत वडार समाजाला प्रतिनिधित्व मिळणार का? स्वीकृत नगरसेवक पदासाठी जोरदार मागणी!
बारामती संपादक -(विकी आगम)
बारामतीच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात आता वडार समाजाच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा चर्चेत आला आहे. शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या वडार समाजाला बारामती नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक पदाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व द्यावे, अशी ठाम मागणी वडार पँथर संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
शहराच्या विकासाच्या चर्चा होतात, विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळते; मग वडार समाजाचा आवाज नगरपरिषदेत का नसावा? असा सवाल समाज बांधवांकडून उपस्थित केला जात आहे.
घरकुल, पाणीपुरवठा, रस्ते, गटार व्यवस्था, शिक्षण, रोजगार आणि जात प्रमाणपत्र अशा अनेक प्रश्नांसाठी समाजाला सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. मात्र, हे प्रश्न थेट नगरपरिषदेत मांडण्यासाठी समाजाचा प्रतिनिधी असणे आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, मागील निवडणुकीच्या काळात वडार समाजाला स्वीकृत नगरसेवक पदावर संधी देण्याबाबत आश्वासन देण्यात आल्याचा दावा समाज बांधव करत आहेत. त्यामुळे आता त्या आश्वासनाची पूर्तता होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वडार समाजाला केवळ आश्वासन नको, तर नगरपरिषदेत सन्मानाचे प्रतिनिधित्व हवे!
कायदेशीर तरतुदी आणि पात्रतेनुसार वडार समाजाला स्वीकृत नगरसेवक पदावर संधी देण्यासाठी नगरपरिषद प्रशासन आणि संबंधित नेतृत्वाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी वडार पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद इरकल यांनी केली आहे.
आता बारामतीच्या राजकीय नेतृत्वाकडून या मागणीला काय प्रतिसाद मिळतो, याकडे वडार समाज बांधवांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )

