साडी बँक उपक्रमाने जिंकली मने गरजू महिलांसाठी मदतीचा हात
बारामती/संपादक-(विकी आगम)
समाजातील गरजू महिलांच्या मदतीसाठी उचललेले एक प्रभावी पाऊल म्हणून रागिनी फाऊंडेशनचा “साडी बँक” उपक्रम यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. महिलांच्या सहभागातून उभा राहिलेला हा उपक्रम केवळ साड्यांचे वितरण नसून समाजातील संवेदनशीलतेचा जिवंत नमुना ठरला आहे.
बारामती व परिसरातील महिलांनी आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात साड्या जमा केल्या. संकलित साड्यांचे वितरण सोमेश्वर सहकारी साखर कारखाना येथील ऊसतोड मजूर महिलांना करण्यात आले. कष्टकरी महिलांना सन्मानाने मदत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. या उपक्रमाबाबत बोलताना अध्यक्षा राजश्री आगम यांनी सांगितले की, “महिलांनी पुढाकार घेतल्यामुळे हा उपक्रम अधिक व्यापक होत आहे. गरजूंना मदत करण्याची ही चळवळ पुढील काळात आणखी मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहे.” विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या वर्षी पार पडलेल्या या उपक्रमाने समाजात सकारात्मक संदेश दिला असून, “एक साडी – एका महिलेसाठी आधार” ही भावना अधिक दृढ केली आहे. साडी संकलनासाठी रंजना झगडे, वृषाली वाघोले, आरती तावरे, ज्योती खानजोडे यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच रागिनी फाऊंडेशन सदस्य मंडळ, संतोष शेंडकर व कोपीवरची शाळा टीम यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. समाजासाठी काम करणाऱ्या अशा उपक्रमांमुळे बारामतीची सामाजिक जाणीव अधिक बळकट होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




