गुटखा माफियांची आता खैर नाही! प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या काळ्या साम्राज्यावर मकोकाचा फास; FDA चा मोठा निर्णय
बारामती/संपादक-(विकी आगम)
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आता कठोर भूमिका घेतली आहे. गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ, निकोटीनयुक्त पानमसाला यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांचा संघटित पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री करणाऱ्या संपूर्ण साखळीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फक्त विक्रेत्यांवर नाही, संपूर्ण टोळीवर कारवाईचा बडगा राज्यात बंदी असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा अवैध व्यवसाय काही ठिकाणी संघटित पद्धतीने सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या व्यवसायामध्ये केवळ किरकोळ विक्रेतेच नाही, तर उत्पादक, पुरवठादार, घाऊक विक्रेते, वितरक, वाहतूकदार, गोदाम चालक आणि आर्थिक व्यवहार सांभाळणारे घटक सहभागी असल्याचे अनेक प्रकरणांत समोर आले आहे. त्यामुळे आता केवळ एखाद्या विक्रेत्यावर कारवाई न करता या अवैध धंद्याची संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने तपास केला जाणार आहे. बनावट कागदपत्रे आणि गुप्त नेटवर्कवर प्रशासनाची नजर प्रतिबंधित पदार्थांचा व्यवसाय करणारे काही घटक बनावट कागदपत्रे, बनावट बिले, डमी कंपन्या, बेनामी व्यवहार, गुप्त गोदामे तसेच आंतरराज्य पुरवठा साखळीचा वापर करत असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकरणांमध्ये आर्थिक व्यवहार, पुरवठ्याचे मार्ग आणि संबंधित व्यक्तींची भूमिका तपासून संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येणार आहे. तरुण पिढीच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना इशारा गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने या पदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, बंदी झुगारून अशा पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांविरोधात आता प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. FDA, पोलीस विभाग आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून राज्यभरात कारवाईला वेग दिला जाणार आहे. बंदी असलेल्या पदार्थांचा काळाबाजार करणाऱ्यांना आता केवळ दंडाची कारवाई नव्हे, तर संघटित गुन्हेगारी कायद्याच्या कक्षेत येण्याचा धोका निर्माण झाला आहे. FDA च्या या निर्णयामुळे गुटखा-तंबाखूच्या अवैध साखळीला मोठा धक्का बसणार आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




