महत्त्वाचेमहाराष्ट्रशहरसामाजिक

बारामतीतील स्ट्रीट लाईट कामांवर नवा वाद “काम पूर्ण… पण बिल नाही?” ठेकेदारांनी थांबवली पुढील कामे; शहरातील अनेक भाग अंधारात


बारामती/संपादक-(विकी आगम) 

बारामती शहरातील स्ट्रीट लाईट आणि एलईडी पोल प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावेळी अपूर्ण कामांबरोबरच “काम पूर्ण करूनही बिल मिळाले नाही” असा गंभीर आरोप संबंधित ठेकेदारांकडून होत असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. माहितीनुसार, काही भागांमध्ये पोल उभारणी, फाउंडेशन आणि एलईडी फिटिंगची कामे पूर्ण करण्यात आली. मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही संबंधित देयके अदा न झाल्याने काही ठेकेदारांनी पुढील कामे थांबवल्याचे बोलले जात आहे. यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये स्ट्रीट लाईट प्रकल्प अर्धवट अवस्थेत पडून असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काही ठिकाणी पोल उभे आहेत पण लाईट सुरू नाहीत, तर काही भागांमध्ये फक्त फाउंडेशन करून काम बंद करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. उत्कर्ष नगर, खंडोबा नगर,तानाजी नगर, संगवी पार्क, जामदार रोड, पंचशील नगर, नीरारोड परिसर यांसह विविध भागांमध्ये नागरिकांना रात्री अंधाराचा सामना करावा लागत असल्याची तक्रार समोर येत आहे.

स्थानिक नागरिक आता प्रशासनाला थेट सवाल विचारू लागले आहेत —

  • काम पूर्ण झाल्यानंतरही बिल का थांबवण्यात आले?
  • संबंधित ठेकेदारांचे देयक प्रलंबित ठेवण्यामागे कारण काय?
  • अपूर्ण कामे आणि बंद स्ट्रीट लाईट्सची जबाबदारी कोणाची?
  • करोडोंचा निधी मंजूर होऊनही नागरिकांना सुविधा का मिळत नाहीत?

या प्रकरणामुळे बारामतीतील विकासकामांच्या नियोजन आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांकडून आता प्रशासनाने तात्काळ खुलासा करून प्रलंबित देयके, अपूर्ण कामे आणि जबाबदार अधिकाऱ्यांबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *