क्राईमताज्या घडामोडीमहत्त्वाचेमहाराष्ट्रशहरसामाजिक

बारामतीत स्ट्रीट लाईट घोटाळा? कागदावर कामे पूर्ण, प्रत्यक्षात अंधार!


बारामती/संपादक-(विकी आगम)
बारामती शहरातील स्ट्रीट लाईट आणि एलईडी पोल प्रकल्पावर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, उपलब्ध कागदपत्रांमधून मोठ्या आर्थिक अनियमिततेचा संशय व्यक्त केला जात आहे. शहरातील विविध भागांमध्ये मंजूर कामे आणि प्रत्यक्षात झालेली कामे यामध्ये मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे. प्राप्त माहितीनुसार ७ मीटर आणि ९ मीटर उंचीच्या पोल प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात टेंडर मंजूर करण्यात आले होते. मात्र अनेक भागांमध्ये फक्त फाउंडेशन करून काम अर्धवट सोडण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही ठिकाणी पोल उभे आहेत, पण एलईडी फिटिंगच नाही; तर काही भागात लाईट सुरूच नसल्याचे वास्तव आहे. समोर आलेल्या अहवालानुसार ९ मीटर हाइट पोल प्रकल्पात एकूण ६६५ टेंडर मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी प्रत्यक्षात फक्त २१० एलईडी फिटिंग पूर्ण झाल्याची नोंद आहे. म्हणजे तब्बल ४५५ एलईडी फिटिंगचे काम बाकी असल्याचे कागदपत्रांवरून दिसत आहे. दुसऱ्या यादीमध्ये १२४८ कामांपैकी अनेक भागांमध्ये केवळ फाउंडेशन किंवा पोल उभारणीपर्यंतच काम मर्यादित राहिल्याचे दिसत आहे. एलईडी फिटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचेही समोर आले आहे. उत्कर्ष नगर, तानाजी नगर, संगवी पार्क, जामदार रोड, पंचशील नगर, शिवाजी नगर, देवकाते पाटील नगर, नीरारोड परिसर, खंडोबा नगर, कांचन नगर यांसारख्या भागांमध्ये अपूर्ण कामांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे आता नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून, खालील प्रश्न उपस्थित केले जात आहेत —

  • मंजूर निधी किती होता?
  • प्रत्यक्ष काम किती झाले?
  • अपूर्ण कामांचे बिल काढण्यात आले का?
  • संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?

बारामती शहरातील विकासकामांच्या पारदर्शकतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *