खाकीच झाली खंडणीखोर! प्राचार्याला POCSOची भीती दाखवून ७ लाख उकळले
बारामती/संपादक-(विकी आगम)
पुण्यात एका प्राचार्याला खोट्या POCSO प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी तीन पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस कर्मचारी सुदाम तायडे आणि दामिनी पथकातील कर्मचारी सोनाली हिंगे यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पोलिसांनी एका कॉलेज प्राचार्याला लक्ष्य करत त्यांच्यावर अल्पवयीन मुलीशी संबंधित गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी भीती निर्माण केली. या प्रकरणात अटक आणि बदनामी होईल, असे सांगून पैशांची मागणी करण्यात आली. भीतीमुळे संबंधित प्राचार्यांनी तब्बल ७ लाख रुपये दिल्याचे समोर आले आहे. मात्र, नंतर संशय आल्याने त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तपासादरम्यान या तिघांनी संगनमताने खोट्या तक्रारीचा आधार घेऊन प्राचार्याला ब्लॅकमेल केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, कायद्याचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




