महत्त्वाचेमहाराष्ट्रराजकीयशहरसामाजिक

नटराज वास्तूत ‘ स्वर्गिय अजितदादा पवार स्मृती भवन’ उभारण्याची मागणी; दया दामोदरे यांचे निवेदन


बारामती/उपसंपादक-(विवेक साळुंके)                           बारामती शहराच्या मध्यवर्ती भागातील तिरंगा चौक येथील ऐतिहासिक नटराज वास्तूस ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या मा. अजितदादा पवार यांचे नाव देऊन तेथे भव्य स्मृती संग्रहालय (Museum) उभारण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दयावान विजय दामोदरे यांनी बारामती नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बारामतीच्या सर्वांगीण विकासात अजितदादा पवार यांचे योगदान मोठे असून त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात पायाभूत सुविधा, शिक्षण, उद्योग, सामाजिक क्षेत्र आणि नागरी विकासाची अनेक कामे झाली आहेत. त्यामुळे तिरंगा चौक येथील नटराज वास्तूचे नामकरण “मा. अजितदादा पवार स्मृती भवन” असे करण्यात यावे. विशेष म्हणजे दादांचा वाढदिवस २२ जुलै रोजी असल्याने त्याच दिवशी नामकरण सोहळा आयोजित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
याचबरोबर सदर वास्तूमध्ये अत्याधुनिक स्मृती संग्रहालय उभारून अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक जीवनाचा इतिहास जतन करण्यात यावा. संग्रहालयात त्यांना प्राप्त झालेले पुरस्कार, सन्मानचिन्हे, महत्त्वाच्या घटनांची छायाचित्रे, बारामतीच्या विकासाशी संबंधित दस्तऐवज, डिजिटल माहिती दालन तसेच त्यांच्या सामाजिक, राजकीय व विकासात्मक कार्याची माहिती जनतेसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच नटराज वास्तू सार्वजनिक हितासाठी बारामती नगरपरिषदेच्या ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. वास्तूसंदर्भात कोणतेही करार, भाडेकरार अथवा इतर कायदेशीर बाबी अस्तित्वात असल्यास त्यांची तपासणी करून जनहिताच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या मागणीबाबत नगरपरिषद प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास व निवेदनाची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही दयावान दामोदरे यांनी दिला आहे. त्यामुळे या मागणीकडे बारामतीकरांचे लक्ष लागले असून नगरपरिषद प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *