वाढत्या उन्हाळ्यात लहान मुलांची विशेष काळजी घ्या; तज्ज्ञांचा सल्ला
बारामती/संपादक-(विकी आगम)
सध्या वाढत्या तापमानामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. उन्हामुळे डोकेदुखी, उलट्या-जुलाब, चक्कर येणे, अशक्तपणा, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पालकांनी मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. शिवानी पाटसकर यांनी सांगितले. भर दुपारी मुलांना बाहेर जाणे टाळावे, सकाळी किंवा संध्याकाळीच खेळण्यासाठी पाठवावे, पुरेशा प्रमाणात पाणी, ताक, सरबत, नारळ पाणी द्यावे तसेच कलिंगड, खरबूज यांसारख्या पाणीदार फळांचा आहारात समावेश करावा, असा सल्ला देण्यात आला. उन्हातून आल्यावर लगेच थंड पदार्थ देऊ नयेत, डोक्यावर टोपी किंवा रुमाल वापरावा तसेच स्वच्छ आहार व पाण्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले. उन्हाळ्यात होणाऱ्या त्रासांवर होमिओपॅथीत काही उपयुक्त औषधे असली तरी ती तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावीत, असे डॉ. पाटसकर यांनी स्पष्ट केले. लहान मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांनी उन्हाळ्यात अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




