शहरसामाजिक

बारामतीत सलून, ब्युटी पार्लर व स्पा आस्थापनांतील कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी सक्तीची करण्याची मागणी


बारामती/संपादक-(विकी आगम)
बारामती तालुक्यातील सलून, ब्युटी पार्लर व तत्सम व्यावसायिक आस्थापनांमध्ये कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी अनिवार्य करण्यात यावी, तसेच ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी बारामती तालुका नाभिक संघटनेने केली आहे. यासंदर्भातील निवेदन बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.

संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी सलून, ब्युटी पार्लर व तत्सम आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी बंधनकारक करण्यात यावी. यासोबतच प्रत्येक कर्मचाऱ्याचे फोटोयुक्त ओळखपत्र, आवश्यक कागदपत्रांची नोंद, तसेच बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात यावी. याशिवाय सर्व आस्थापनांमध्ये कार्यरत अवस्थेतील सीसीटीव्ही यंत्रणा असावी, त्याचे फुटेज निश्चित कालावधीपर्यंत जतन करावे आणि नियमांचे पालन होत आहे की नाही, याची वेळोवेळी पोलीस व संबंधित प्रशासनाकडून तपासणी करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही संघटनेने केली आहे. बारामती तालुका नाभिक संघटनेने स्पष्ट केले की, या मागणीमागे कोणत्याही धर्म, जात किंवा समाजाविरोधात भूमिका घेण्याचा उद्देश नसून, सर्व व्यावसायिक आस्थापनांसाठी समान नियम लागू व्हावेत, ग्राहक व नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळावे आणि कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट व्हावी, हा एकमेव हेतू आहे. संघटनेच्या या मागणीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील सर्व सलून, ब्युटी पार्लर व तत्सम व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने सुरक्षा नियमांचे पालन करून आपल्या आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी पूर्ण करावी, असे आवाहनही बारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

 


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *