बारामतीत बनावट सिगारेटचा पर्दाफाश; ११ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त, चौघांवर गुन्हा
श्रीरामनगरमध्ये पोलिसांची कारवाई; गोल्ड फ्लेक व गोल्ड फ्लेक लाईट १०७ सिगारेटचा संशयित साठा जप्त, चौघांविरोधात गुन्हा
बारामती/संपादक -(विकी आगम)
बारामती शहर पोलिसांनी श्रीरामनगर परिसरात कारवाई करत बनावट असल्याचा संशय असलेल्या गोल्ड फ्लेक आणि गोल्ड फ्लेक लाईट १०७ सिगारेटचा मोठा साठा जप्त केला आहे. सिगारेटसह टाटा कॅरी पिकअप असा एकूण ११ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी चौघांविरोधात कॉपीराइट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे २९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास श्रीरामनगर येथे पोलिसांनी टाटा कॅरी पिकअपची तपासणी केली. तपासणीदरम्यान गोल्ड फ्लेक सिगारेटचे ५० बॉक्स, गोल्ड फ्लेक लाईट १०७ चे १३० बॉक्स आणि टाटा कॅरी पिकअप असा एकूण ११.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात हुजेब फिरोज बागवान, रयान आयुब खान, जाकिर अल्लादिन शेख आणि पप्पू निशाद यांच्याविरोधात कॉपीराइट कायदा, १९५७ मधील कलम ५१ व ६३ अन्वये बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
FIRमधील माहितीनुसार, जप्त मालाचे नमुने तपासणीसाठी राखून ठेवण्यात आले असून, या कथित बनावट सिगारेटच्या पुरवठ्यामागील संपूर्ण साखळीचा तपास सुरू आहे. बारामतीत एवढ्या मोठ्या प्रमाणात संशयित बनावट सिगारेटचा साठा कुठून आला, याचा उलगडा पुढील तपासातून होणार आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार क्षिरसागर हे पोलीस निरीक्षिक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




