महत्त्वाचेमहाराष्ट्रराजकीयशहरसामाजिक

पारदर्शक प्रशासनासाठी नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा लाईव्ह करा; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी


बारामती/संपादक-(विकी आगम)                       बारामती नगर परिषदेची १२ जून २०२६ रोजी होणारी सर्वसाधारण सभा नागरिकांना प्रत्यक्ष पाहता यावी यासाठी सभेचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह स्ट्रिमिंग) करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अॅड. सुधीर शरद पाटसकर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभांमध्ये नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेतले जातात. मात्र या चर्चांची आणि निर्णयप्रक्रियेची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नाही. त्यामुळे सभेचे थेट प्रक्षेपण केल्यास नागरिकांना प्रत्यक्ष निर्णयप्रक्रिया पाहता येईल तसेच लोकप्रतिनिधींची भूमिका समजून घेता येईल. यूट्यूब, फेसबुक अथवा बारामती नगर परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरून सभेचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यामुळे प्रशासनातील पारदर्शकता वाढण्यास, लोकसहभागाला चालना मिळण्यास आणि नागरिकांचा स्थानिक स्वराज्य संस्थांवरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होईल, असेही नमूद करण्यात आले आहे. मुंबई आणि पुणे महानगरपालिकांमध्ये अशा प्रकारे सभांचे थेट प्रक्षेपण करण्यात येत असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. बारामती नगर परिषद प्रशासनानेही त्याच धर्तीवर पाऊल उचलून १२ जून रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेचे लाईव्ह स्ट्रिमिंग करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष निलेश वाबळे,

प्रितम तपकीरे ,तसेच गणेश कदम उपस्थित होते.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *