आता औषध कुठून घ्यायचे हे रुग्ण ठरवणार; हॉस्पिटलच्या मेडिकल मक्तेदारीला तुकाराम मुंढेंचा दणका
बारामती/संपादक-(विकी आगम)
रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा देणारा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने (FDA) घेतला आहे. अनेकदा काही रुग्णालयांकडून औषधे व वैद्यकीय साहित्य केवळ हॉस्पिटलमधील मेडिकल स्टोअरमधूनच घेण्याचा दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर FDA ने रुग्णांच्या हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
रुग्णांना औषधे कुठून खरेदी करायची याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. परवानाधारक कोणत्याही मेडिकल दुकानातून रुग्ण औषधे खरेदी करू शकतात. हॉस्पिटलमधील मेडिकल स्टोअरमधूनच औषधे घेण्याची सक्ती करता येणार नाही, असे FDA कडून स्पष्ट करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेत रुग्णांच्या अधिकारांना प्राधान्य दिले आहे. हॉस्पिटल प्रशासनाने उपचार घेत असलेल्या रुग्णांवर औषधे खरेदी करण्यासाठी कोणताही दबाव आणू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. उपचार घेणे ही रुग्णाची गरज असली तरी औषध खरेदीचा निर्णय घेण्याचा अधिकार हा रुग्णाचा आहे. औषधांची किंमत, उपलब्धता आणि गुणवत्ता यांचा विचार करून रुग्णाला योग्य पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे. जर एखाद्या रुग्णाला औषधे खरेदी करण्यासाठी सक्ती किंवा दबाव टाकला जात असेल, तर संबंधित रुग्ण FDA कडे तक्रार करू शकतो. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉस्पिटलवर नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते. या निर्णयामुळे खासगी रुग्णालयांमधील औषध विक्रीच्या पद्धतींवर नियंत्रण येण्याची शक्यता असून, रुग्णांना आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळणार आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




