सायबर फसवणूक प्रकरणात बारामती पोलिसांची मोठी कारवाई; ₹1.30 कोटींची फसवणूक, ₹44 लाख रक्कम फ्रीज
बारामती
WhatsApp ग्रुप, बनावट ट्रेडिंग App आणि IPO मधून भरघोस नफ्याचे आमिष दाखवत तब्बल ₹1 कोटी 30 लाखांची सायबर फसवणूक करणाऱ्या संघटित रॅकेटचा बारामती शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांनी आतापर्यंत सुमारे ₹44 लाखांची रक्कम विविध बँक खात्यांमध्ये फ्रीज करण्यात यश मिळवले आहे. बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. 113/2026 भा.न्या.संहिता 2023 कलम 318(4), 316(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66(C), 66(D) अन्वये हा गंभीर गुन्हा दाखल असून त्याचा तपास अत्यंत वेगाने आणि तांत्रिक पद्धतीने सुरू आहे. तपासात उघड झाले की, फिर्यादी यांना “F24 Indian Stock Market Investors Discussion Group” या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी करून विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर “FARLEYLLC” नावाचे बनावट App डाउनलोड करून त्यावर खाते उघडण्यास सांगण्यात आले. या App वर खोटा नफा, वाढती रक्कम आणि यशस्वी ट्रेडिंग दाखवून फिर्यादी यांच्याकडून टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम उकळण्यात आली. आरोपींनी “जास्त पैसे भरा – जास्त नफा मिळवा”, “IPO मध्ये मोठा परतावा”, “account activation / withdrawal charges” अशा विविध कारणांनी सतत पैसे भरण्यास भाग पाडले. तपासात ही रक्कम प्रथम मध्यस्थ खात्यांमध्ये जमा करून layering पद्धतीने अनेक खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर ATM, Cash Deposit Machine आणि merchant transactions द्वारे पैसे काढण्यात आले. या कारवाईदरम्यान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, पोलीस हवालदार सुलतान डांगे, यशवंत पवार, रामचंद्र शिंदे तसेच सागर जामदार, अक्षय सिताफ, सुरज घाटे, विशाल शिंदे व गिरीश नेवसे यांच्या पथकाने दोन आरोपींना अटक केली. अटक आरोपींनी ATM द्वारे पैसे काढून मुख्य सूत्रधारांच्या सांगण्यावरून SBI च्या खात्यांमध्ये सुमारे ₹1.90 लाख जमा केल्याचे कबूल केले आहे. संबंधित खात्यांवर देखील तात्काळ फ्रीजची कारवाई सुरू करण्यात आली आहे. मुख्य आरोपी व संपूर्ण सायबर जाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष पथके कार्यरत असून मनी ट्रेल, डिजिटल पुरावे, बँक व्यवहार, ATM फुटेज, मोबाईल डेटा तसेच Telegram, WhatsApp, Instagram नेटवर्कचा सखोल तपास सुरू आहे. हा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोरपणे सुरू आहे. पोलिसांचा इशारा : अनोळखी WhatsApp/Telegram ग्रुप, बनावट गुंतवणूक App, “Guaranteed Return”, “Double Money”, “IPO Profit” अशा आमिषांना बळी पडू नका. कोणालाही OTP, UPI PIN, बँक तपशील देऊ नका. तत्काळ मदत – 1930 सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्वरित 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास पैसे फ्रीज करून परत मिळण्याची शक्यता वाढते. “सायबर गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांच्या पैशांचे संरक्षण हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे,” असे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी स्पष्ट केले.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




