IPO आमिषाने ₹1.30 कोटींची सायबर लूट; बारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ₹44 लाख फ्रीज
बारामती/संपादक -(विकी आगम)
: IPO व शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ₹1 कोटी 30 लाखांची सायबर फसवणूक करणाऱ्या संघटित टोळीचा बारामती शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे ₹44 लाखांची रक्कम फ्रीज करण्यात आली आहे. तपासात उघड झाले की, “F24 Indian Stock Market Investors Discussion Group” या WhatsApp ग्रुपद्वारे फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर “FARLEYLLC” नावाचे बनावट App डाउनलोड करून त्यावर खोटा नफा, वाढती गुंतवणूक व मोठा परतावा दाखवत फिर्यादी यांच्याकडून टप्प्याटप्प्याने कोट्यवधी रुपये उकळण्यात आले. या रकमेचा माग काढताना ती प्रथम मध्यस्थ खात्यांमध्ये जमा करून layering पद्धतीने अनेक खात्यांमध्ये वळवण्यात आली. त्यानंतर ATM, Cash Deposit Machine व merchant transactions च्या माध्यमातून पैसे काढण्यात आले. ही संपूर्ण फसवणूक अत्यंत नियोजनपूर्वक चालणाऱ्या सायबर रॅकेटमार्फत केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांच्या तपास पथकाने तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. त्यांनी ATM द्वारे पैसे काढून मुख्य सूत्रधारांच्या सांगण्यावरून SBI च्या खात्यांमध्ये सुमारे ₹1.90 लाख जमा केल्याचे कबूल केले आहे. संबंधित खात्यांवरही तात्काळ फ्रीजची कारवाई करण्यात आली आहे. सध्या पोलिसांकडून मुख्य आरोपी, आर्थिक व्यवहार व Telegram, WhatsApp, Instagram द्वारे चालणाऱ्या संपूर्ण सायबर जाळ्याचा सखोल तपास सुरू असून मनी ट्रेल, डिजिटल पुरावे, ATM फुटेज व मोबाईल डेटा तपासला जात आहे. हा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू आहे. नागरिकांना इशारा : अनोळखी WhatsApp/Telegram ग्रुप, बनावट गुंतवणूक App, “Guaranteed Return”, “Double Money”, “IPO Profit” अशा आमिषांना बळी पडू नका. कोणालाही OTP, UPI PIN किंवा बँक तपशील देऊ नका. सायबर मदत – 1930 फसवणूक लक्षात येताच त्वरित 1930 वर संपर्क साधल्यास पैसे फ्रीज करून परत मिळण्याची शक्यता वाढते. “सायबर गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांच्या पैशांचे संरक्षण हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे,” असे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी स्पष्ट केले.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




