गाजलेल्या बलात्कार, खंडणी व सावकारी प्रकरणातील आरोपीला अखेर जामीन; तीन महिन्यांनंतर कारागृहातून सुटका”
बारामती/संपादक-(विकी आगम)
बलात्कार, खंडणी आणि सावकारी अधिनियमांतर्गत दाखल असलेल्या गाजलेल्या गुन्ह्यातील आरोपीची अखेर जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मागील सुमारे तीन महिन्यांपासून येरवडा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या आरोपीला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने अटी-शर्तींसह जामीन मंजूर केला.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार बलात्कार, खंडणी तसेच सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणाची चर्चा राज्यभरात झाली होती.जामिनासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावरील सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने पुराव्यांतील अस्पष्टता, तसेच सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांच्या महत्त्वपूर्ण न्यायनिर्णयांचा आधार घेत युक्तिवाद केला. त्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेऊन पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला ₹१५,००० च्या वैयक्तिक मुचलका व न्यायालयाने घालून दिलेल्या अटी-शर्तींच्या अधीन राहून जामीन मंजूर केला. त्यानुसार दि. २१ जुलै २०२६ रोजी आरोपीची कारागृहातून सुटका करण्यात आली. या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. विजय भालेराव व ॲड. शुभंकर बाचल यांनी बाजू मांडली. त्यांना प्रतिक शेलार आणि प्रज्वल नाकाडे यांनी सहकार्य केले.
दरम्यान, या प्रकरणाचा अंतिम निकाल अद्याप लागलेला नसून, जामीन मंजूर होणे म्हणजे आरोप सिद्ध झाले किंवा आरोपी निर्दोष ठरला, असा त्याचा अर्थ होत नाही. अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच होणार आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




