बारामतीत पोलिसांवर थेट हल्ला! कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायाला मारहाण; ६ जणांवर गंभीर गुन्हा
बारामती/संपादक-(विकी आगम)
बारामती शहरातील आमराई परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी धावून गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावरच हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (१० जुलै) पहाटे घडली. दोन गटांतील राडा थांबवण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी आरोपींनी हुज्जत घालत थेट बलप्रयोग केल्याचा आरोप असून, या घटनेत एक पोलीस शिपाई जखमी झाला आहे. या प्रकरणी सहा जणांसह त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि आर्म्स ॲक्टअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे १.३० वाजता डायल ११२ वर आमराई परिसरात दोन गटांमध्ये मारामारी सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर बारामती शहर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मोठा गोंधळ सुरू असल्याने पोलिसांनी जमाव पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी पोलिसांच्या कायदेशीर आदेशांचे उल्लंघन करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला आणि पोलिसांवरच हल्ला चढविल्याचा आरोप आहे.
या घटनेत एक पोलीस शिपाई जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. या प्रकरणी शुभम भीमराव कांबळे, विपुल अजय अवचिते, शुभम अजय अवचिते, ओम मिथुन पाटोळे, गणेश शंकर पाथरकर आणि त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११५(१), १२१(१), १३२, १९५(१), २२१, ३(५) तसेच आर्म्स ॲक्ट कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची छाननी सुरू असून त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाईचाही प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल व्हिडिओ, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब यांच्या आधारे तपास अधिक वेगाने सुरू आहे.
“कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जीवाची पर्वा न करता घटनास्थळी धावणाऱ्या पोलिसांवर हात उचलणाऱ्यांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा बारामती शहर पोलिसांनी दिला आहे. लोकसेवकांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाचा पुढील तपास बारामती शहर पोलीस ठाण्याकडून सुरू असून, पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




