क्राईममहत्त्वाचेमहाराष्ट्रशहरसामाजिक

नोटीस नाही… आदेश नाही… तरी खासगी मालमत्तेत घुसून कंपाऊंडची तोडफोड? मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस निरीक्षक, जेसीबी चालक व मालकाविरोधात कारवाईची मागणी; पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार


‘तहसीलदारांच्या तोंडी आदेशावर कारवाई’ झाल्याचा दावा; लाखभरांच्या नुकसानीचा आरोप, संबंधित अधिकारी, पोलीस निरीक्षक, जेसीबी चालक व मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

बारामती/संपादक-(विकी आगम)
पुरंदर तालुक्यातील मौजे निरा शिवतकर येथे खासगी मालमत्तेत कोणतीही लेखी नोटीस, न्यायालयीन आदेश अथवा सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी नसताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रवेश करून कंपाऊंडची तोडफोड केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी अर्जदार विनोद हनुमंतराव भोसले यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रार दाखल करून संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस निरीक्षक, जेसीबी चालक, जेसीबी मालक तसेच इतर जबाबदार व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, मौजे निरा शिवतकर (ता. पुरंदर) येथील गट क्रमांक १३३ मधील २.५ आर क्षेत्रावरील जागा अर्जदाराच्या कायदेशीर मालकी व ताब्यात आहे. सदर जागेभोवती त्यांच्या खर्चातून तारांचे कंपाऊंड उभारण्यात आले होते. मात्र, ३ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता संबंधित अधिकारी व कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता खासगी मालमत्तेत दाखल झाले आणि जेसीबीच्या सहाय्याने कंपाऊंडची तोडफोड केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या अर्जदाराच्या नातेवाईकांनी कारवाई थांबविण्याची विनंती केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून तोडफोड सुरूच ठेवण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे अर्जदाराचे अंदाजे एक लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीत पुढे असा दावा करण्यात आला आहे की, संबंधित अधिकाऱ्यांकडे कोणतीही लेखी नोटीस, न्यायालयीन आदेश किंवा सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी नव्हती. घटनेनंतर विचारणा केली असता “तहसीलदारांच्या तोंडी आदेशानुसार कारवाई करण्यात आली,” असे मंडळ अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे.
या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ व ऑडिओ पुरावे उपलब्ध असून, ते चौकशीसाठी सादर करण्याची तयारी अर्जदाराने दर्शविली आहे. तसेच संबंधित अधिकारी, पोलीस निरीक्षक, जेसीबी चालक, जेसीबी मालक व इतर जबाबदार व्यक्तींविरुद्ध लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी, कठोर कारवाई आणि झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी पोलीस अधीक्षक (ग्रामीण), पुणे यांच्याकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, या तक्रारीमुळे महसूल विभागाच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणात पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते आणि संबंधित अधिकाऱ्यांवर पुढे काय कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *