महत्त्वाचेमहाराष्ट्रशहर

बारामतीचा अभिमान! ३६५ शेतकऱ्यांच्या यशोगाथांना मिळवून दिली राज्यस्तरीय दखल; योगेश नालंदे यांना राज्यपालांच्या हस्ते ‘वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार


३६५ शेतकऱ्यांच्या यशोगाथांना दिली राज्यभर ओळख; कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय जनजागृतीची राज्य शासनाकडून दखल

बारामती | संपादक -(विकी आगम)
कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट जनजागृती, शेतकऱ्यांच्या यशोगाथांना व्यापक प्रसिद्धी आणि डिजिटल माध्यमातून कृषी माहितीचा प्रभावी प्रसार केल्याबद्दल बारामतीचे युवा पत्रकार योगेश नालंदे यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे सन २०२४ चा ‘वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मुंबई येथे कृषी दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यपाल जीष्णू देव वर्मा यांच्या हस्ते त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, भरतशेठ गोगावले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
योगेश नालंदे यांनी अल्पावधीतच ३६५ शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी यशोगाथा शोधून त्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून राज्यभर पोहोचवल्या. या यशोगाथांमुळे हजारो शेतकऱ्यांना नवे प्रयोग, आधुनिक शेती आणि यशस्वी शेती पद्धतींबाबत प्रेरणा मिळाली. शेतकऱ्यांपर्यंत सकारात्मक शेतीचा संदेश पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने कृषी प्रसाराचे कार्य केले.
याशिवाय कृषी वाहिनीमध्ये कार्यरत असताना बाजारभाव, हवामान अंदाज तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती नाट्यरूप ऑडिओच्या माध्यमातून तयार करून रेडिओवर प्रसारित केली. डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करत कृषी विभागाच्या विविध योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. शेतकरी हिताच्या उद्देशाने त्यांनी ‘शेतकरी योद्धा’ या वृत्तपत्राचीही सुरुवात केली असून, त्यातून कृषी क्षेत्रातील सकारात्मक आणि उपयुक्त माहिती सातत्याने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासन शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत, भविष्यातही शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राज्यस्तरीय ‘वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार’ मिळाल्याने बारामतीच्या पत्रकारिता क्षेत्रासह कृषी क्षेत्रातही आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून योगेश नालंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *