माऊस ग्लूमध्ये अडकलेल्या सापाला सर्पमित्रामुळे मिळाले जीवदान
बारामती | संपादक ( विकी आगम )
बारामती येथील कारभारी नगर , कसबा परिसरात उंदरांसाठी लावलेल्या माऊस ग्लूमध्ये एक बिनविषारी साप अडकून पडल्याची घटना घडली. सर्पमित्राच्या वेळीच मिळालेल्या मदतीमुळे सापाचे प्राण वाचले.घरात लावलेल्या माऊस ग्लूमध्ये आधी एक उंदीर अडकला होता. त्याला भक्ष्य करण्यासाठी घरात शिरलेला साप ग्लूला चिकटून तिथेच अडकून पडला. साप हालचाल करू शकत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र आदित्य पारखे यांनी घटनास्थळी येऊन तेलाच्या सहाय्याने सापाला सावधपणे ग्लूमधून मुक्त केले. कोणतीही इजा न होता सापाची सुटका करण्यात आली असून त्याला नंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.या घटनेमुळे माऊस ग्लूसारख्या साधनांमुळे निरपराध प्राणी अडकण्याचे धोके पुन्हा समोर आले आहेत. नागरिकांनी अशा ग्लूचा वापर टाळावा, असे आवाहन सर्पमित्रांकडून करण्यात आले.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




