जखमी अवस्थेतील महाराष्ट्राच्या राज्यपक्ष्याचे ग्रीन वर्ल्ड फाउंडेशनकडून यशस्वी रेस्क्यू
बारामती/संपादक -(विकी आगम)
निसर्गाचा अनमोल ठेवा असलेल्या महाराष्ट्राच्या राज्यपक्षी ‘हरियाल’ (Yellow-footed Green Pigeon) या दुर्मिळ पक्षाला बारामतीत जीवदान मिळाले आहे. मोरगाव रस्त्यावरील सोळस्कर वस्ती परिसरात हा पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला. याची माहिती मिळताच ग्रीन वर्ल्ड फाउंडेशनच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेत पक्षाचे यशस्वी रेस्क्यू केले.
जखमी अवस्थेतील या पक्षाची काळजीपूर्वक सुटका करण्याचे काम सर्पमित्र आदित्य पारखे यांनी केले. पक्ष्याला कोणतीही इजा होणार नाही याची खबरदारी घेत त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर आवश्यक उपचार करण्यात आले.
याबाबत माहिती देताना संस्थेचे सर्पमित्र अमोल जाधव यांनी सांगितले की, ‘हरियाल’ हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी असून तो प्रामुख्याने झाडांवर वास्तव्य करणारा पक्षी आहे. हिरवट आणि पिवळसर रंगामुळे हा पक्षी अत्यंत आकर्षक दिसतो. वड, पिंपळ यांसारख्या झाडांची फळे हे त्याचे प्रमुख खाद्य असून, पर्यावरणातील बीजप्रसार आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यात या पक्षाची महत्त्वाची भूमिका आहे.
वाढते शहरीकरण, झाडांची घटती संख्या आणि बदलते नैसर्गिक अधिवास यामुळे अशा पक्ष्यांची संख्या कमी होत असल्याचे पर्यावरणप्रेमींचे मत आहे. त्यामुळे जखमी वन्यजीवांना तातडीने मदत करणे ही पर्यावरण संवर्धनाची महत्त्वाची जबाबदारी ठरत आहे.
ग्रीन वर्ल्ड फाउंडेशनच्या या तत्पर कामगिरीमुळे एका दुर्मिळ पक्ष्याचा जीव वाचला असून, बारामतीतील पर्यावरणप्रेमींकडून संस्थेच्या टीमचे आणि सर्पमित्रांचे कौतुक केले जात आहे.
निसर्ग वाचवण्याचा संदेश देत ग्रीन वर्ल्ड फाउंडेशनची वन्यजीव संरक्षणासाठीची धडपड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




