बारामती हादरली: अत्याचार प्रकरणातील आरोपीचा वडगाव निंबाळकर पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू
बारामती/संपादक-(विकी आगम)
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर परिसरात अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि जबरदस्तीने गर्भपात केल्याच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील आरोपीचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, १३ वर्षीय मुलगी आणि ४८ वर्षीय आरोपी हे नातेवाईक होते. आरोपीने मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप असून, त्यानंतर ती गर्भवती राहिल्याची बाब समोर आली. पुढे तिला फलटण येथील एका खासगी रुग्णालयात नेऊन गर्भपात करण्यात आल्याचे उघड झाले. ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. मात्र, पोलीस कोठडीत असताना आरोपीचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, त्याने गळफास घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून निष्पक्ष चौकशीची मागणी होत आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )

