जमीनधारकांसाठी मोठी खुशखबर; NA प्रक्रियेत राज्य सरकारचा मोठा बदल
बारामती/संपादक-(विकी आगम)
महाराष्ट्रातील जमीन व्यवहार आणि बांधकाम क्षेत्रासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून स्वतंत्र एनए (NA) परवानगी प्रक्रियेत मोठे सुलभीकरण करण्यात आले आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असून जमीन वापर बदलाच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. पूर्वी एनए परवानगीसाठी अनेक टप्प्यांत कागदपत्रे, मंजुऱ्या आणि वेळखाऊ प्रक्रिया पार करावी लागत होती. नव्या व्यवस्थेमुळे काही प्रकरणांत संबंधित प्राधिकरणांच्या मंजुरीतूनच प्रक्रिया पूर्ण मानली जाणार असल्याने नागरिकांची धावपळ आणि प्रशासकीय अडथळे कमी होणार आहेत. या निर्णयामुळे जमीन व्यवहार, गृहनिर्माण आणि गुंतवणूक क्षेत्राला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वेळ आणि खर्च वाचण्यास मदत होणार असल्याने सर्वसामान्यांसाठी हा निर्णय दिलासादायक मानला जात आहे. मात्र, बांधकाम नियम, झोनिंग नियम आणि स्थानिक प्राधिकरणांच्या अटी कायम लागू राहणार असून “NA पूर्णपणे बंद” असा अर्थ या निर्णयातून होत नाही, हे स्पष्ट करण्यात येत आहे. प्रशासन सुलभीकरणाच्या दिशेने राज्य सरकारचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असून नागरिकांमध्ये या निर्णयाचे स्वागत होत आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )

