शासकीय अधिकाऱ्याला लक्ष्य; हनी ट्रॅपमधून अॅट्रॉसिटीची भीती दाखवून उकळ
बारामती/संपादक-(विकी आगम)
हनी ट्रॅपच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्याला जाळ्यात अडकवून अॅट्रॉसिटी कायद्याच्या नावाखाली खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. 142/2026 अन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्राथमिक तपासात उघड झाले की, आरोपींनी नियोजनपूर्वक एका महिलेमार्फत अधिकाऱ्याशी ओळख वाढवली. फोन व व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क ठेवत विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी देत बदनामीचा धाक दाखवण्यात आला.यानंतर आरोपींनी संगनमताने खोट्या बलात्कार व अॅट्रॉसिटी गुन्ह्याची भीती दाखवून तब्बल ₹50 लाखांची मागणी केली. ही रक्कम पुढे ₹25 लाख व नंतर ₹10 लाखांपर्यंत आणली गेली. सतत फोन करून धमक्या देत पैशांची मागणी सुरूच ठेवण्यात आली.तपासात असेही समोर आले की, आरोपींनी दबाव वाढवत ₹1 लाखांची रक्कम उकळली असून ती बारामती MIDC परिसरात घेतली गेली. तसेच फिर्यादीला प्रत्यक्ष भेटीस बोलावून वाहनात बसवून मोबाईल तपासणे, दमदाटी करणे आणि पुन्हा मोठ्या रकमेची मागणी करणे असे प्रकार घडले.फिर्यादीने संपूर्ण संभाषण दुसऱ्या मोबाईलवर रेकॉर्ड करून पोलिसांकडे पुरावे दिले आहेत. “पैसे दिले नाहीत तर बलात्कार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू”, “मीडियात बदनामी करू” अशा स्पष्ट धमक्या रेकॉर्डिंगमध्ये आढळून आल्या आहेत.या प्रकरणात हनी ट्रॅप, व्हिडिओ ब्लॅकमेलिंग, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर व खंडणी उकळणे असा गंभीर गुन्हेगारी प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी डिजिटल पुरावे जप्त करून FSL तपास, CCTV विश्लेषण व कॉल डिटेल रेकॉर्डची छाननी सुरू केली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड व प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलिसांचा इशारा:
हनी ट्रॅप व ब्लॅकमेलिंगच्या घटनांपासून सावध राहा. अपरिचित व्यक्तींशी व्हिडिओ कॉल, वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळा. अशा प्रकारची घटना घडल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )





