३४ लाखांच्या आर्थिक फसवणुकीचा पर्दाफाश ६ महिन्यांपासून फरार आरोपी बारामती पोलिसांच्या जाळ्यात
बारामती/संपादक -(विकी आगम)
बारामती शहर पोलीस स्टेशन येथे नोंद गुन्हा क्र. ३१४/२०२५, भा.न्या.संहिता कलम ३१६(४), ३१८(४) अन्वये दाखल असलेल्या गंभीर आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी दत्तात्रय पोपटराव खुळे (रा. माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे) यास तब्बल ६ महिन्यांच्या फरारीनंतर अखेर बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे. सदर प्रकरणात आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून हॉटेल व्यवसायातील व्यवस्थापक म्हणून काम करताना ग्राहकांची बनावट नावे नोंदवून, खोटी उधारी दाखवून तसेच आर्थिक व्यवहारात फेरफार करून तब्बल ₹३४,३३,३९३/- (चौतीस लाख तेहतीस हजार तीनशे त्र्याण्णव रुपये) इतक्या रकमेचा अपहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने जाणीवपूर्वक फरार राहून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, बारामती शहर पोलिसांनी तांत्रिक तपास, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढत अत्यंत शिताफीने त्यास अटक केली.या कारवाईमुळे “गुन्हेगार कितीही चलाख असला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही” हा ठोस संदेश समाजात पुन्हा अधोरेखित झाला आहे.ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक श्री चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री अशोक राऊत तसेच तपास पथकातील सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप जाधव, पोलीस हवालदार श्री रामचंद्र शिंदे आणि पोलीस शिपाई श्री अक्षय सिताफ यांनी समन्वयाने व धडाडीने ही कारवाई यशस्वी केली.सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अपहार झालेली रक्कम व संबंधित पुरावे जप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांसाठी आवाहन :कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा आर्थिक फसवणुकीबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ बारामती शहर पोलीसांशी संपर्क साधावा.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )

