बारामतीत हॉस्पिटलमध्ये चोरी ड्रॉवर उचकटून १५ लाखांची रोकड लंपास पोलिसांचा तपास सुरू
बारामती/संपादक-(विकी आगम)
बारामती शहरातील भिगवण रोडवरील संगवी टाऊनशिप परिसरात असलेल्या “प्रिझ्मा आय केअर” हॉस्पिटलमध्ये चोरीची घटना उघडकीस आली असून सुमारे १५ लाख रुपये रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १३ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ६.२० वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने हॉस्पिटलच्या मुख्य दरवाजाजवळील ग्रॅनाईट चौकट तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर हॉस्पिटलमधील ड्रॉवर उचकटून सुमारे ₹१५,००,००० (पंधरा लाख रुपये) रोख रक्कम चोरी करून आरोपी तेथून पसार झाला.या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ९७/२०२६ अंतर्गत भा.न्या.सं. कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी CCTV फुटेज तपासणे, तांत्रिक तपास तसेच विशेष पथकाद्वारे शोधमोहीम राबविण्यात येत आहे.दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर पोलिसांनी नागरिक व व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मोठ्या प्रमाणात रोख रक्कम कार्यालय, दुकान किंवा हॉस्पिटलमध्ये ठेवू नये, परिसरात सक्षम CCTV कॅमेरे बसवून ते कार्यरत ठेवावेत, तसेच सुरक्षित लॉकिंग सिस्टीम व अलार्म सिस्टीमचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच रात्रीच्या वेळी शक्य असल्यास सुरक्षा रक्षक ठेवणे, परिसरात संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देणे आणि शेजारील व्यापाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून परिसरावर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलीस स्टेशन किंवा आपत्कालीन क्रमांक ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )

