बारामतीत २५ हजारांच्या लाचेप्रकरणी पोलिस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

बारामती/प्रतिनिधी – विकी आगम
जामीन प्रक्रियेत मदत करून देण्याच्या नावाखाली २५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बारामती तालुक्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पोलिस कर्मचारी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत होता. तक्रारदार महिलेच्या मुलावर दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच जामीन मिळवून देण्याच्या प्रक्रियेत सहकार्य करण्यासाठी सुरुवातीला ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. चर्चेनंतर २५ हजार रुपये देण्याचे ठरले.
या मागणीबाबत संबंधित महिलेने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे पैसे स्वीकारताना पोलिस कर्मचाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने पार पाडली.
लाच मागणाऱ्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांविरोधात नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




