आरोग्यउद्योगक्राईममहत्त्वाचेमहाराष्ट्रशहरसामाजिक

बारामतीत संशयित दूध भेसळ प्रकरणाचा तपास वेगात; वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे होणार कठोर कारवाई


अन्न सुरक्षा विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई; वैज्ञानिक अहवालांच्या आधारेच पुढील कठोर निर्णय

बारामती/संपादक-(विकी आगम)  

बारामती शहरातील संशयित दूध व दुग्धजन्य पदार्थ भेसळ प्रकरणाचा तपास आता अधिक व्यापक आणि निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, अन्न सुरक्षा विभाग व बारामती शहर पोलिसांनी संयुक्तपणे वैज्ञानिक, तांत्रिक आणि कायदेशीर चौकशीला वेग दिला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 278/2026 दाखल असून भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 अंतर्गत विविध कलमांनुसार तपास सुरू आहे.

तपासादरम्यान जप्त करण्यात आलेले नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यांचे वैज्ञानिक विश्लेषण सुरू आहे. याशिवाय संबंधित व्यवहारांतील FSSAI परवाने, GST नोंदी, बँक व्यवहार, आर्थिक दस्तऐवज, मोबाईल डेटा, CCTV फुटेज, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि संपूर्ण पुरवठा साखळी यांची बारकाईने तपासणी केली जात आहे. या प्रकरणात कोणाची नेमकी भूमिका होती, याचा प्रत्येक स्तरावर शोध घेतला जात आहे.

पोलीस तपासात प्रथमदर्शनी माहिती समोर आलेल्या संबंधित व्यक्तींना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या असून आवश्यक कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांची माहिती आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, नोटीस बजावणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरली असा अर्थ होत नाही, हे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाचा तपास मा. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे करीत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) राज्यभर दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविरोधात विशेष मोहीम राबवत असून, विविध जिल्ह्यांमध्ये कृत्रिम व भेसळयुक्त दूध प्रकरणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अन्नभेसळ हा केवळ आर्थिक गुन्हा नसून नागरिकांच्या आरोग्याशी आणि जीविताशी संबंधित गंभीर विषय असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

बारामती शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, दूध व दुग्धजन्य पदार्थ केवळ परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावेत. संशयास्पद प्रकार, कृत्रिम दूध निर्मिती, रासायनिक पदार्थांचा वापर, अवैध साठवणूक किंवा वाहतूक याबाबत विश्वसनीय माहिती असल्यास ती तात्काळ पोलिसांना किंवा अन्न सुरक्षा विभागाला द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख कायद्याच्या अधीन राहून गोपनीय ठेवली जाईल.

पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, वैज्ञानिक अहवाल, दस्तऐवजी पुरावे, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारेच पुढील कारवाई केली जाईल. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तर निर्दोष व्यक्तींवर कोणताही अन्याय होणार नाही याचीही दक्षता घेतली जाईल.

 


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *