संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे महाअन्नदान; आकर्षक देखाव्याने वेधले वारकऱ्यांचे लक्ष
बारामती/संपादक-(विकी आगम)
सालाबादप्रमाणे यंदाही बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त सिनेमा रोड येथे राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान व अखिल मंडई मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश रविंद्र धालपे यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमाला वारकरी, भाविक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पालखी सोहळ्यानिमित्त महाअन्नदानाचे आयोजन करण्यात आले. तसेच दुसऱ्या दिवशी पालखी प्रस्थानाच्या वेळी वारकरी बंधू-भगिनींसाठी गरम इडली-सांबार व चहाचे वाटप करण्यात आले. हजारो वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेत आयोजकांचे कौतुक केले.
यावेळी उभारण्यात आलेला आकर्षक स्टेज, त्यावरील देखावा तसेच मनमोहक रोषणाई व लाईट इफेक्ट हे यंदाच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले. या देखाव्यासमोर वारकरी, भाविक आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात छायाचित्रे काढत या क्षणांची आठवण जपली.
महाअन्नदान, चहा व गरम नाश्ता वाटपाचा संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र अथक परिश्रम घेतले. या सेवाकार्यात आशिष घोरपडे, अश्विन भोकरे, आनंद खुळपे, रोहित पिसे, अनिकेत धालपे, मयुरेश पांढरे, विशाल कोकरे, अक्षय कुलकर्णी, पंढरीनाथ कदम, पप्पू धनराळे, स्वप्निल खरात तसेच प्रतिष्ठान व अखिल मंडई मंडळ ट्रस्टच्या इतर सर्व कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.
सेवाभाव, नियोजन आणि वारकऱ्यांप्रती असलेली निस्वार्थ भावना यामुळे राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठानचा हा उपक्रम यंदाच्या पालखी सोहळ्यात विशेष चर्चेचा विषय ठरला.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )

