बारामतीत पोलीस भरतीचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; PSI सह एकावर गुन्हा दाखल
बारामती | संपादक-(विकी आगम)
बारामतीत पोलीस भरती आणि पोलीस बँड भरती परीक्षेत अधिक गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका युवतीचे कथित लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक (PSI) अमरनाथ कुंभार आणि पोलीस बँड कॉन्स्टेबल मारुती करे यांच्याविरुद्ध बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपींनी पोलीस भरतीत मदत करण्याचे आश्वासन देत पीडित युवतीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध कारणांनी संपर्कात ठेवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेला सुरुवातीला पोलीस ठाण्यात न्याय मिळाला नसल्याचा आरोप असून, अखेर तिने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींपैकी एक जण कार्यरत पोलीस उपनिरीक्षक असल्याने या घटनेमुळे पोलीस दलातही खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला असला, तरी अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप पीडितेकडून करण्यात आला आहे. पीडितेने आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली असून, कारवाई न झाल्यास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास बारामती ग्रामीण पोलीस करत असून, आरोपींकडून अद्याप या आरोपांवर सार्वजनिक भूमिका समोर आलेली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच प्रकरणातील वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होणार आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




