धर्मरक्षणासाठी अन्यायाला प्रतिकार आवश्यक; अहिल्यादेवींचा आदर्श समाजाने स्वीकारावा – पू. रामगिरी महाराज
बारामती | संपादक-(विकी आगम)
सकल हिंदू समाज, बारामती यांच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात धर्म, संस्कृती आणि राष्ट्रसेवेचा संदेश देण्यात आला. प्रमुख वक्ते पू. रामगिरी महाराज यांनी आपल्या प्रभावी भाषणातून हिंदू धर्माची वैशिष्ट्ये आणि धर्मरक्षणाची भूमिका स्पष्ट करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
“हिंदू हा अहिंसा पाळणारा आहे; मात्र अन्याय, अत्याचार आणि हिंसेसमोर कधीही झुकणारा नाही. अन्यायाला प्रतिकार करणे हीच खरी धर्मसेवा आहे,” असे प्रतिपादन पू. रामगिरी महाराज यांनी केले. जगातील सर्वात प्राचीन, संस्कृतीशी घट्ट जोडलेला आणि सनातन परंपरेचे जतन करणारा हिंदू धर्म प्रत्येक जीवाबद्दल करुणा बाळगण्याची शिकवण देतो. मात्र समाजावर अन्याय होत असेल तर त्याविरुद्ध ठामपणे उभे राहण्याची प्रेरणा संत, महापुरुष आणि इतिहासातील आदर्श व्यक्तिमत्त्वांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे हेमंत हरहरे यांनी आपल्या मनोगतात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करताना, लोककल्याणकारी प्रशासन, मंदिरांचा जीर्णोद्धार, धार्मिक स्थळांचे संवर्धन आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी केलेले योगदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. सिंधुताई वाघमोडे यांनी अहिल्यादेवींच्या बालपणापासून ते एक यशस्वी, न्यायप्रिय आणि लोकाभिमुख राज्यकर्त्या म्हणून केलेल्या कार्याचा सविस्तर आढावा घेत उपस्थितांना त्यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंतराव हरहरे यांना मल्हार क्लब यांच्या वतीने यावर्षीचा प्रतिष्ठेचा ‘मल्हाररत्न’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते पू. रामगिरी महाराज यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या मूर्तीचे लोकार्पण. ही मूर्ती लवकरच अहिल्या उद्यानात स्थापित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच सकल हिंदू समाज, बारामती यांच्या वतीने प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व मान्यवरांचा परिचय दिलीप शिंदे आणि देवेंद्र बनकर यांनी करून दिला. धनंजय मेळकुंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर अशोक पाखले यांनी आभार प्रदर्शन केले. आभार प्रदर्शनानंतर पसायदानाने कार्यक्रमाची भावपूर्ण सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला बारामती व परिसरातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. धर्म, संस्कृती, समाजजागृती आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणादायी कार्याचा जागर घडवून आणणारा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




