‘बाळाला चुकीचे औषध दिले’ असा आरोप; डॉक्टरांच्या उपचारानंतर महिला नर्सवर कथित हल्ला
बारामती | संपादक-(विकी आगम)
बारामती एमआयडीसी येथील सिटी हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये बालरुग्णावर सुरू असलेल्या उपचारादरम्यान निर्माण झालेल्या वादाने गंभीर वळण घेतल्याची घटना समोर आली आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या उपचारांनुसार औषध दिल्यानंतरही ताप कमी न झाल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकाने महिला स्टाफ नर्सला कथितरित्या मारहाण, विनयभंग, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला स्टाफ नर्सच्या फिर्यादीवरून एफआयआर क्रमांक ३०५/२०२६ नोंदविण्यात आला असून “मुलानी” (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ११५(२), ३५१(२), ३५१(३) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, २४ जून रोजी रात्री तापाने त्रस्त असलेल्या बालरुग्णावर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधाची गोळी रुग्णाच्या नातेवाईकांकडून मागवून ती बालरुग्णाला देण्यात आली. काही वेळाने ताप कायम असल्याचे सांगत नातेवाईकांनी पुन्हा डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी औषधाचा परिणाम होण्यासाठी काही वेळ लागू शकतो, असे समजावून सांगितले होते, असे फिर्यादीत नमूद आहे.
मात्र, त्यानंतर संबंधित व्यक्तीने रुग्णालयात आरडाओरडा करत “बाळाला चुकीचे औषध दिले” असा आरोप करत महिला नर्सला जाब विचारला. नर्सने डॉक्टरांच्या चिठ्ठीनुसारच औषध दिल्याचे सांगून समजावण्याचा प्रयत्न केला. तरीही संबंधित व्यक्तीने तिच्याशी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली, तिच्या छातीला अयोग्य स्पर्श करून विनयभंग केला तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
यावेळी मध्यस्थी करण्यासाठी धावून आलेल्या रुग्णालयातील वॉचमनलाही धक्का देऊन खाली पाडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर संबंधित महिला नर्सने बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या घटनेमुळे रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी दिवस-रात्र सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना आरोग्य कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन व कथित हल्ल्याच्या घटना वाढत असल्याबद्दल वैद्यकीय क्षेत्रातून चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




