बारामतीत चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे २४ तासांत जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
बारामती/संपादक-(विकी आगम) बारामती तालुक्यातील जैनकवाडी फाटा परिसरात चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांच्या आत जेरबंद केले आहे.
दि. २२ जून २०२६ रोजी रात्री आठच्या सुमारास कृष्णा दीपक सुपेकर (वय २०, रा. शारदानगर, बारामती) हे भिगवण रोडने बारामतीकडे येत असताना जैनकवाडी फाटा येथे चार अज्ञात इसमांनी त्यांना अडवून मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील सॅमसंग एस-२४ मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला होता. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ११५(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना आरोपींचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तुषार भाऊ ढोबे (रा. कसबा, बारामती), राहुल दिनेश बेंद्रे (रा. खंडोबानगर चारी, बारामती) तसेच दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या यामाहा कंपनीच्या मोटारसायकल, होंडा ॲक्टिव्हा तसेच चोरी केलेला मोबाईल असा एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर तेलंग, स्वप्निल अहिवळे, अजय घुले, सुलतान डांगे, पोलीस अमलदार रहिस मुलाणी, गणेश डेरे व तुषार चव्हाण यांनी केली.
२४ तासांत आरोपी जेरबंद केल्याने पुणे ग्रामीण पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




