नामांकित कंपनीच्या डिझाईनची नक्कल; बारामतीत 82 हजारांचा माल जप्त
बारामती/संपादक -(विकी आगम) नामांकित कंपनीच्या उत्पादनाच्या डिझाईनची नक्कल करून तयार करण्यात आलेल्या संशयित बनावट पी.ओ.पी. सिलिंग पट्ट्यांचा साठा बारामती शहर पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. या कारवाईत सुमारे 82 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दुकान मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्पीड सर्च अँड सिक्युरिटी नेटवर्क प्रा. लि., चंदीगड येथील फिल्ड एक्झिक्युटीव्ह सरफराज अब्दुल रऊफ तांबोळी यांनी SAINT-GOBAIN INDIA PRIVATE LIMITED कंपनीच्या उत्पादनाच्या डिझाईनची नक्कल करून पी.ओ.पी. सिलिंग पट्ट्यांची निर्मिती व विक्री होत असल्याची माहिती बारामती शहर पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे देशमुख वस्ती, पाटस रोड येथील समीर एंटरप्राईजेस या दुकानावर पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला. पाहणीदरम्यान संबंधित कंपनीच्या मूळ उत्पादनाशी साधर्म्य असलेल्या पी.ओ.पी. सिलिंग पट्ट्यांचा मोठा साठा आढळून आला. कारवाईत 12 फूट लांबीच्या व 2 इंच रुंदीच्या पी.ओ.पी. सिलिंग पट्ट्यांचे 59 बंडल, म्हणजेच 1180 नग जप्त करण्यात आले. जप्त मालाची किंमत अंदाजे 82 हजार 600 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पंचासमक्ष नमुने वेगळे काढून उर्वरित माल जप्त करून सीलबंद करण्यात आला. याप्रकरणी दुकान मालक शरफुद्दीन सैपूल्लाह कुरेशी (वय 38, रा. रेणुका नगर, फलटण रोड, बारामती) याच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 220/2026 अन्वये प्रतीलिपी अधिकार अधिनियम 1957 मधील कलम 51, 63 व 65 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जप्त मालाचा उगम, उत्पादन साखळी, पुरवठादार, विक्री व्यवहार, आर्थिक व्यवहार तसेच आवश्यक परवानग्यांबाबत सखोल तपास सुरू केला आहे. तसेच संबंधित कंपनीकडून तांत्रिक व कायदेशीर अभिप्राय घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. बौद्धिक संपदा हक्कांचे उल्लंघन करून बनावट उत्पादनांची निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला असून नागरिकांनी अशा संशयास्पद उत्पादनांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे करीत आहेत.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




