क्राईमताज्या घडामोडीमहत्त्वाचेमहाराष्ट्रशहरसामाजिक

अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांची फसवणूक? मौलाना अब्दुल हलीम शेखविरोधात गुन्हा, आरोपी फरार


बारामती/संपादक-(विकी आगम)                  बारामती शहरात अंधश्रद्धा, काळी विद्या आणि खोट्या तांत्रिक उपायांच्या नावाखाली महिलांची आर्थिक व मानसिक फसवणूक करणाऱ्या भोंदू टोळीचा बारामती शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मौलाना अब्दुल हलीम शेख व त्याच्या साथीदारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या फिर्यादीनुसार आरोपी स्वतःला धार्मिक व तांत्रिक उपाय करणारा, काळी विद्या दूर करणारा, संकट निवारण करणारा “मौलाना” म्हणून लोकांमध्ये प्रसिद्ध करत होता. घरगुती व कौटुंबिक अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवत आरोपी नागरिकांमध्ये भीती निर्माण करून लाखो रुपयांची उकळपट्टी करत असल्याचे तपासात समोर आले आहे.फिर्यादी महिलेकडून आरोपी व त्याच्या सहकाऱ्यांनी रोख रक्कम, चेक तसेच PhonePe / UPI व्यवहारांद्वारे मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. या व्यवहारांचे इलेक्ट्रॉनिक पुरावे, WhatsApp चॅट, कॉल डिटेल्स आणि आर्थिक व्यवहारांची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.याहून धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने तथाकथित तांत्रिक उपायांच्या नावाखाली संबंधित महिलेला रात्री-अपरात्री बोलावून तिच्याशी गैरवर्तन करत विनयभंगाचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. “काळी विद्या करेन”, “तुझे कुटुंब उद्ध्वस्त होईल”, “वाईट परिणाम होतील” अशा धमक्या देऊन महिलेमध्ये भीती निर्माण करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा रजि. नं. 194/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 316, 318(4), 351(2), 74, 75, 3(5) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व काळी जादू प्रतिबंध व निर्मूलन अधिनियम 2013 चे कलम 3 व 4 प्रमाणे गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मिळताच आरोपी काश्मीर येथे पळून गेल्याची माहिती समोर आली असून बारामती शहर पोलिसांकडून त्याचा तांत्रिक तपास युद्धपातळीवर सुरू आहे. मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड, ऑनलाइन व्यवहार आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव तपास करीत आहेत. बारामती शहर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करत म्हटले आहे की, अंधश्रद्धा, काळी विद्या, तांत्रिक उपाय, धार्मिक भीती किंवा संकट निवारणाच्या नावाखाली कोणी फसवणूक करत असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. संबंधितांची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *