नदीत उडी, उसात लपला… तरीही बारामती शहर पोलिसांच्या जाळ्यातून सुटला नाही
बारामती/संपादक-(विकी आगम)
बारामती शहर पोलिसांनी शिताफीपूर्ण आणि धाडसी कारवाई करत तब्बल १५ गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने नॉन बेलेबल वॉरंट जारी केलेला फरार आरोपी शंकर उर्फ पोक्या प्रकाश आडके (रा. मळद, ता. बारामती, जि. पुणे) याच्या अखेर मुसक्या आवळल्या. अनेक वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस जेरबंद करण्यात बारामती शहर पोलिसांना यश आले असून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.सदर आरोपीविरुद्ध बारामती शहर पोलीस स्टेशन, बारामती तालुका पोलीस स्टेशन तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे विविध गंभीर गुन्हे दाखल असून अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाने त्याच्याविरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट जारी केले होते. न्यायालयीन प्रक्रियेला वारंवार गैरहजर राहत आरोपी अनेक वर्षांपासून फरार होता. दिनांक २४ मे २०२६ रोजी सकाळी बारामती शहर पोलिसांना आरोपी आपल्या मूळ गावी आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस हवालदार टापरे, पोलीस शिपाई गिरीश नेवसे व पोलीस शिपाई वैभव मदने यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने करा नदीत उडी घेतली तसेच जवळील उसाच्या फडात लपण्याचा प्रयत्न केला. मात्र बारामती शहर पोलिसांनी परिसरात शिताफीने शोधमोहीम राबवत अखेर आरोपीस जेरबंद केले. सदर आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास येरवडा कारागृह, पुणे येथे न्यायालयीन कोठडी सुनावली. या कारवाईत महिला पोलीस हवालदार सगुना आवटे व पोलीस हवालदार उमा कोकरे यांचेही मोलाचे योगदान राहिले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस पथकाने पार पाडली.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




