कसबा परिसरात चोरट्यांचा मुक्त वावर; CCTV फुटेजमुळे खळबळ
बारामती/संपादक-(विकी आगम)
बारामती शहरातील कसबा परिसरात पुन्हा एकदा चोरट्यांचा वावर समोर आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. श्रीराम नगर भागात पहाटेच्या अंधारात तीन संशयित चोरटे दबक्या पावलांनी फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले असून, या घटनेमुळे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. माहितीनुसार, पहाटे अंदाजे चारच्या सुमारास तीन अज्ञात इसम एका घरासमोरील गेट उघडण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. काही वेळ परिसरात संशयास्पद हालचाली केल्यानंतर त्यांनी तेथून पलायन केले. मात्र त्यांची प्रत्येक हालचाल CCTV मध्ये कैद झाल्याने परिसरात एकच चर्चा रंगली आहे. दरम्यान, श्रीराम नगर परिसरातून निघाल्यानंतर संबंधित चोरट्यांनी जामदार रोड भागात चोरी केल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. त्यामुळे “चोरट्यांची टोळी शहरात सक्रिय झाली आहे का?” असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गेल्या काही दिवसांत शहर व उपनगरांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली वाढल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये विशेष चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे रात्रीची गस्त वाढवण्याची, संशयितांचा तातडीने शोध घेण्याची आणि शहरातील प्रमुख भागांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी केली आहे. “वेळीच कठोर कारवाई झाली नाही, तर नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास डळमळीत होईल,” अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
नागरिकांना आवाहन: रात्री अपरात्री परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलीस हेल्पलाईन 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




