क्राईममहत्त्वाचेमहाराष्ट्रशहरसामाजिक

गोरक्षक आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत गोवंशीय जनावरांच्या अवैध कत्तलीचा भंडाफोड


बारामती/संपादक-(विकी आगम)
बारामती तालुक्यातील माळेगाव पोलिस स्टेशन हद्दीत गोवंशीय जनावरांच्या अवैध कत्तलीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू असतानाही राजरोसपणे गायींची कत्तल सुरू असल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गोरक्षकांच्या सतर्कतेनंतर पोलिसांनी धाड टाकत तिघांविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले असून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 17 मे 2026 रोजी सकाळी नेपतवळण परिसरातील एका पत्राशेडमध्ये गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल सुरू असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यानंतर माळेगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाड टाकत कारवाई केली असता धक्कादायक प्रकार समोर आला.
या प्रकरणी बिलाल कुरेशी, अक्षय उर्फ बबलू विजय बागाव (रा. मेढद, ता. बारामती) आणि बापू कोंडीबा ठोंबरे (रा. मेढद, ता. बारामती) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 238, 325, 3(5) तसेच प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियम 1960 आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान आरोपी बबलू बागाव याने आपल्या शेडमध्ये कथितरित्या कत्तलीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे समोर आले, तर आरोपी बापू ठोंबरे हा रक्ताचे डाग साफ करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनास्थळाबाहेर तीन खिलार जातीच्या देशी गायी अत्यंत दयनीय अवस्थेत, चारा-पाण्याविना दोरखंडाने बांधलेल्या स्थितीत आढळून आल्या. हे दृश्य पाहून स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला.
पोलिसांनी घटनास्थळावरून रक्तमिश्रित मांसाचे तुकडे, चाकू, लोखंडी हुक, रक्ताने माखलेले दोर, रक्तमिश्रित पाणी व इतर साहित्य जप्त केले असून जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 55 हजार 400 रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या कारवाईमुळे बारामती परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास माळेगाव पोलिसांकडून सुरू आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *