संतांविषयीच्या कथित वक्तव्यावरून वारकरी समाज आक्रमक; पोलीस व प्रांत कार्यालयाकडे कारवाईची मागणी
बारामती/संपादक-(विकी आगम) महाराष्ट्राच्या संत परंपरेविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून बारामतीत हिंदुत्ववादी संघटना आणि वारकरी समाज आक्रमक झाला असून संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषद – बारामती तालुका आणि समस्त वारकरी भाविक समाजाच्या वतीने बारामती पोलीस निरीक्षकांकडे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे पदाधिकारी विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायाबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राची संत परंपरा ही हिंदू संस्कृतीची ओळख असून वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकारांविषयी अपमानास्पद भाषा वापरणे ही संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेवर घाला घालणारी बाब आहे. अशा वक्तव्यामुळे लाखो हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनाला इशारा देत संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच संबंधित भाषणाचे व्हिडिओ, ऑडिओ आणि सोशल मीडियावरील पुरावे तपासून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. “संतांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही,” अशी ठाम भूमिका वारकरी समाज आणि हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली. यावेळी ह.भ.प. श्रीराम महाराज नांदलकर, ह.भ.प. माऊली महाराज गवारे, ह.भ.प. रामदास महाराज जाधव , प्रशांत नाना सातव (हिंदुत्ववादी प्रखर नेते) यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदू बांधव, वारकरी भाविक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )

