अभाविप बारामतीचा तीव्र निषेध; नसरापूर प्रकरणातील आरोपीस फाशीची मागणी
बारामती/संपादक-(विकी आगम)
बारामती, दि. ०४ मे २०२६ : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात नसरापूर येथे चार वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. या अमानुष घटनेविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) बारामती शाखेने भिगवण चौकात जोरदार निषेध आंदोलन करत संताप व्यक्त केला. “अशा नराधमांना जगण्याचा अधिकार नाही, तात्काळ फाशी द्या!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका करत, या प्रकरणात विलंब न करता जलदगतीने न्याय मिळावा आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा—फाशी—देण्यात यावी, अशी ठाम मागणी केली. अभाविपच्या वतीने सांगण्यात आले की, समाजात वाढत चाललेल्या अशा विकृत प्रवृत्तींना आळा बसवण्यासाठी कठोर कायदे आणि तत्काळ अंमलबजावणी गरजेची आहे. अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याचा धोका कायम राहील. या आंदोलनात प्रदेश सहमंत्री श्रावणी बाचल, जिल्हा सहसयोजक ओंकार तावरे, शहर सहमंत्री तन्मयी कोंढाळकर, शहर संपर्क प्रमुख पारस हवलदार, शहर कार्यकारणी सदस्य आदित्य गुरसुळकर, टीसी कॉलेज संपर्क प्रमुख ओम परकाळे यांच्यासह निखिल जाधव, प्रतीक पाटील, श्रुती त्यारे, दिक्षा लोंढे, सिमरन मुलाणी, रोहित नरुटे, ओम काटे, तन्मय काजळे, शुभम शेंडे, वैभव शेंडे, सिद्धार्थ रासकर, प्रथमेश गायकवाड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेमुळे संतापाची लाट उसळली असून, राज्यभरातून कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )

