डॉ. पांडुरंग गावडे यांचे स्पष्टीकरण; शासकीय शिक्का कर्मचाऱ्याकडून चुकून वापरल्याचा दावा
बारामती/संपादक-(विकी आगम)
शासकीय शिक्क्याच्या वापराच्या प्रकरणामुळे डॉ. पांडुरंग गावडे चर्चेत आले असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.दरम्यान, या घडामोडींवर डॉ. गावडे यांनी स्पष्टीकरण देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संबंधित शिक्का त्यांनी स्वतः वापरलेला नसून, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडूनच तो वापरला गेला असावा, असा त्यांचा दावा आहे. डॉ. गावडे यांनी पुढे स्पष्ट करताना सांगितले की, ते २०१० साली सिल्वर ज्युबिली रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यावेळचा शिक्का चुकून बाहेर ठेवलेल्या बॉक्समध्ये राहिला असावा आणि तोच शिक्का रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून नजरचुकीने वापरला गेला असावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.तसेच वादग्रस्त ठरलेले सर्टिफिकेट हे त्यांच्या स्वतःच्या रुग्णालयाच्या लेटरहेडवर साध्या स्वरूपात देण्यात आलेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रमाणपत्रामुळे कोणताही आर्थिक किंवा इतर प्रकारचा फायदा किंवा तोटा झालेला नसल्याचेही त्यांनी नमूद केले.या संपूर्ण प्रकरणामागे कोणताही फसवणुकीचा हेतू नसून, हा प्रकार केवळ चुकून घडल्याचे त्यांनी सांगितले. काही गैरसमजांमधूनच हा गुन्हा उद्भवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.याशिवाय, या प्रकरणाची सुनावणी मा. न्यायालयात झाल्याचे सांगत, त्यावेळीही न्यायालयाने डॉक्टरांच्या विरोधात कोणतीही प्रतिकूल निरीक्षणे नोंदवलेली नसल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, डॉ. गावडे यांनी तक्रारदार सतीश गावडे यांच्यावर गंभीर आरोप करत, ते बोगस डॉक्टर असल्याचा दावा केला आहे. पळशी, निरगुडे आणि सावल या ठिकाणी ते डॉक्टर म्हणून रुग्णांना इंजेक्शन व सलाईन लावत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, उलट त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.तसेच, आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, सर्व बाजू तपासल्यानंतरच पुढील निर्णय होणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )





