वाढत्या उन्हात लहान मुलांच्या आरोग्याची घ्या विशेष काळजी; डॉ. शिवानी पाटसकर यांचा पालकांना सल्ला
बारामती/संपादक-(विकी आगम)
सध्या वाढत्या उन्हाळ्यामुळे तापमानात मोठी वाढ होत असून त्याचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता वाढली आहे. शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे अनेक मुले दिवसभर बाहेर खेळत असतात.
मात्र तीव्र उन्हामुळे मुलांना विविध आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे पालकांनी उन्हाळ्यात मुलांची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. शिवानी पाटसकर यांनी दिला आहे.उन्हाळ्यात लहान मुलांमध्ये वारंवार डोकेदुखी, उलट्या-जुलाब, चक्कर येणे, त्वचा कोरडी पडणे, तोंड व घसा कोरडा पडणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे तसेच इलेक्ट्रोलाइटचे संतुलन बिघडणे अशा समस्या आढळून येतात. काही वेळा अशक्तपणा, थकवा, चिडचिड वाढणे तसेच रक्तातील साखर अचानक कमी होऊन चक्कर येण्याचीही शक्यता असते.डॉ. पाटसकर यांच्या मते, या त्रासामागे उन्हात जास्त वेळ राहणे, डोक्याला उन्हाचा तडाखा बसणे, पुरेसे पाणी न पिणे, उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पदार्थ खाणे किंवा पिणे, अस्वच्छ पाणी व अन्न सेवन करणे तसेच फळे-भाज्या न धुता खाणे ही प्रमुख कारणे आहेत.हा त्रास टाळण्यासाठी शक्यतो भर दुपारी बाहेर जाणे टाळावे. मुलांना सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ऊन कमी झाल्यानंतरच खेळण्यासाठी बाहेर पाठवावे. दिवसभर मुलांना भरपूर पाणी द्यावे. पाणी पिण्याची सवय नसल्यास सरबत, ताक किंवा फळांचा रस यांसारखे पातळ पदार्थ द्यावेत. कार्बोनेटेड पेय टाळावीत.कलिंगड, खरबूज यांसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे मुलांच्या आहारात समाविष्ट करावीत. शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलित राहण्यासाठी लिंबू सरबत किंवा नारळ पाणी देणे उपयुक्त ठरते. मुलं बाहेरून आल्यावर लगेच थंड पाणी किंवा पदार्थ देण्याऐवजी प्रथम हात-पाय धुण्यास सांगावे, त्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. तसेच उन्हात बाहेर पडताना टोपी किंवा रुमालाचा वापर करावा.उन्हाळ्यात जेवण कमी झाल्यामुळे मुलांमध्ये अशक्तपणा येऊ शकतो. त्यामुळे सकाळच्या वेळेत मुलांना पौष्टिक आहार देण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.दरम्यान, उन्हाळ्यात लहान मुलांना होणाऱ्या काही त्रासांवर होमिओपॅथीमध्ये ग्लोनाईनं, ब्रायोनिया, कार्बोवेज, न्याट्रम मूर यांसारखी औषधे उपयुक्त ठरू शकतात. मात्र कोणतेही औषध तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे, असे आवाहनही डॉ. पाटसकर यांनी केले आहे.
डॉ. शिवानी पाटसकरBHMS, DYN, DIACH (Greece)होमिओपॅथिक तज्ज्ञ – संपर्क : ८६९८२७५४३४

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )

