डिजिटल अरेस्टच्या नावाखाली बारामतीत ४५ लाख ६० हजारांची सायबर फसवणूक
बारामती/संपादक -(विकी आगम)
सायबर गुन्हेगारांकडून “डिजिटल अरेस्ट”च्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटना वाढत असून बारामतीतही असा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शकुंतला उद्धव खर्डे (वय ७४, रा. डोर्लेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यांना १४ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान एका अनोळखी व्यक्तीकडून व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल करण्यात आला.
संबंधित व्यक्तीने स्वतःला “संदीप पाटील” नावाचा पोलीस अधिकारी असल्याचे सांगत पोलीस गणवेशात व्हिडिओ कॉल करून विश्वास संपादन केला.यानंतर फिर्यादींविरोधात अटक वॉरंट असल्याचे सांगून त्यांना “डिजिटल अरेस्ट” होईल अशी भीती दाखवण्यात आली. भीती आणि मानसिक दबाव निर्माण करून आरोपीने फिर्यादींना बँकेतील एफ.डी. तोडण्यास सांगितले आणि वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे वर्ग करण्यास भाग पाडले.आरोपीच्या सांगण्यावरून फिर्यादींनी ३४ लाख ६० हजार रुपये आणि ११ लाख रुपये असे मिळून एकूण ४५ लाख ६० हजार रुपये विविध बँक खात्यांवर वर्ग केले. काही दिवसांनंतर आरोपीशी संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.या प्रकरणी गुन्हा क्रमांक ८३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१९ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (C) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.पोलीसांचे नागरिकांना आवाहन पोलीस, सीबीआय, ईडी किंवा न्यायालयाचे अधिकारी असल्याचे सांगून कोणीही फोन किंवा व्हिडिओ कॉलवर “डिजिटल अरेस्ट”ची भीती दाखवत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नये. कोणत्याही परिस्थितीत फोनवरून पैसे ट्रान्सफर करू नयेत.अशा प्रकारे पैसे मागितल्यास त्वरित १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा आणि जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी केले आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )





